ढाका - न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि बांगलादेशचा फिरकी गोलंदाजी प्रशिक्षक डॅनियल व्हेट्टोरी मदतीसाठी धावून आला आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या (बीसीबी) कमी पगाराच्या कर्मचार्यांना व्हेट्टोरी आर्थिक मदत देणार आहे. व्हेट्टोरी आपल्या मानधनाचा काही भाग या कर्मचाऱ्यांना देईल.
बीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी निजामुद्दीन चौधरी यांनी ही माहिती दिली. चौधरी म्हणाले, "आपल्या मानधनाचा काही भाग बीसीबीच्या कमी पगाराच्या कर्मचाऱ्यांना देण्यात यावा असे व्हेट्टोरीने सांगितले. याबाबत त्यांनी क्रिकेट संचालन समितीला अधिकृतपणे माहिती दिली आहे.'' 41 वर्षीय व्हेट्टोरीने किती देणगी दिली आहे, याचा खुलासा करण्यात आलेला नाही.
व्हेट्टोरी हा बांगलादेशच्या कोचिंग स्टाफमध्ये सर्वाधिक मानधन घेणारा सदस्य आहे. 100 दिवसाच्या करारासाठी त्याला 250,000 डॉलर्स दिले जातात. यंदा होणाऱ्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत त्याचा करार आहे. 2015 मध्ये व्हेट्टोरी निवृत्त झाला होता. त्यानंतर त्याने आयपीएलमध्ये बंगळुरु संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले होते.