नवी दिल्ली - भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. ते ७३ वर्षांचे होते. चेतन चौहान यांची शनिवारी सायंकाळी प्रकृती खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. १२ जुलैला कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर लखनऊ येथील संजय गांधी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, चिंताजनक प्रकृतीमुळे त्यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले.
माध्यमांच्या वृत्तानुसार, मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे अचानक त्यांची प्रकृती बिघडली. चेतन चौहान अमरोहा जिल्ह्यातील नौगावा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्या ते योगी सरकारमधील सैनिक कल्याण, होमगार्ड, पीआरडी, नागरी संरक्षण विभागात मंत्री होते.
चेतन चौहान यांनी १९६९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. लिटल मास्टर सुनील गावस्कर यांच्यासोबत त्यांनी भारतासाठी सलामीवीराची भूमिका पार पाडली. गावस्कर आणि चौहान यांच्या जोडीने कसोटी सामन्यातील ६० डावात ५४.८५ च्या सरासरीने ३१२७ धावा केल्या. दोघांनी एकूण ११ शतकांची भागीदारी केली. कारकीर्दीत एकही शतक न करता दोन हजार धावा करणारे ते जगातील पहिले क्रिकेटपटू होते. शतक न करता सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू शेन वॉर्नच्या नावावर आहे.
चौहान यांनी भारताकडून ४० कसोटी आणि ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी अनुक्रमे २०८४ आणि १५३ धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चौहान यांनी मोठी कामगिरी केली होती. १७९ प्रथम श्रेणी सामन्यांत त्यांनी २१ शतके आणि ५९ अर्धशतकांसह ११,१४३ धावा केल्या आहेत. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी १९६७-१९७५ दरम्यान महाराष्ट्राचे तर, १९७५ ते १९८५ दरम्यान दिल्लीचे प्रतिनिधित्व केले होते. १९८१ मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.