झारखंड - यंदाच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने क्रिकेटमधून काही कालावधीसाठी विश्रांती घेतली. सैन्यातून सेवा बजावून आल्यानंतर विंडीज आणि आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी धोनी संघात परतेल अशी चाहत्यांची आशा होती. मात्र, ती फोल ठरली. आता तो क्रिकेट सोडून दुसरा खेळ खेळताना दिसून आला आणि त्याचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले.
हेही वाचा - 'धोनीला, सन्मानपूर्वक निवृत्ती मिळायला हवी, तो त्याचा हक्क आहे'
झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनमध्ये (जेएससीए) धोनी बिलियर्ड्स खेळताना दिसून आला. जेएससीएच्या कॅम्पसमध्ये धोनीने सहकाऱ्यांसोबत वेळ घालवला. त्याने नुकताच एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये एक फलंदाज गल्ली क्रिकेट खेळत आहे. धोनीने हा व्हिडिओ शेअर करताना शाळेच्या आठवणींना उजाळा दिला होता.
१२ वर्षांपूर्वी धोनीने पाकला मात देऊन भारतासाठी पहिला टी-२० विश्वचषक मिळवून दिला. नुकत्याच झालेल्या वेस्ट इंडिज मालिकेत धोनी खेळला नव्हता. सध्या सुरु असलेल्या विजय हजारे करंडकासाठी खेळणार नसल्याचे धोनीने स्पष्ट केले आहे. सुमारे दोन महिन्यांचा ब्रेक घेऊन धोनी सप्टेंबरमध्ये क्रिकेटच्या मैदानात उतरेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, धोनीने आपला ब्रेक अजून अडीच महिने वाढवल्याचे समजते आहे.