नवी दिल्ली - “पाकिस्तानविरूद्ध २००४ मध्ये केलेल्या शतकी खेळीमुळे धोनी धावांचा भूकेला असल्याचे मला वाटले. त्याच्या या खेळीमुळे भारताला एक विश्वासू यष्टीरक्षक मिळाला जो द्रविडची जागा भरून काढू शकणार होता”, अशी प्रतिक्रिया भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने दिली आहे. महेंद्रसिंह धोनीसाठी ५ एप्रिल हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. धोनीने आजच्या दिवशी २००५ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक झळकावले होते.
नेहरा म्हणाला, "त्या खेळीमुळे संघाला आत्मविश्वास मिळाला की आमच्याकडेही एक चांगला यष्टीरक्षक फलंदाज असू शकतो. धोनीसाठी पहिले काही सामने चांगले नव्हते. पण त्याच्यासारख्या आत्मविश्वासू माणसाला संधी मिळाली. आत्मविश्वास ही धोनीची मजबूत बाजू आहे. त्याने तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी केली. त्याने आपली कामगिरी सिद्ध केली. त्या मालिकेत भारताने चार सामने गमावले पण भारताला धोनीसारखा खेळाडू मिळाला.”
तो संघात आला तेव्हा चांगला यष्टीरक्षक नव्हता. त्याआधी खेळलेला प्रत्येकजण एक चांगला यष्टीरक्षक होता. तो किरण मोरे आणि नयन मोंगियासारखा नव्हता. मात्र, शिस्त, उत्साह, आत्मविश्वासाने त्याने सर्व गोष्टी साध्य केल्या. दिनेश कार्तिक आणि पार्थिव पटेल जे करू शकत नाही ते धोनीने केले. धोनीने संधीचे धोनीने सोने केले, असेही नेहराने म्हटले आहे.
धोनीने विशाखापट्टणमच्या मैदानात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पहिल्या शतकाची नोंद केली होती. धोनीने १२३ चेंडूत १५ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने १४८ धावांची खेळी केली होती. त्यांच्या या खेळीमुळे भारताने पाकिस्तानसमोर निर्धारीत ५० षटकात ९ बाद ३५६ धावांचा डोंगर उभारला होता. धोनीला या सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि राहुल द्रविड यांनी मोलाची साथ दिली. भारताने हा सामना पाकिस्तानला २९८ धावांमध्ये रोखत आरामात जिंकला. आशिष नेहराने या सामन्यात ४ गडी बाद केले होते.