दुबई - भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजांवर टीका केली आहे. ''काही फलंदाज सरकारी नोकरीप्रमाणेच संघात खेळण्याचा विचार करतात'', असे सेहवागने म्हटले. यंदाच्या आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीचा चेन्नईचा संघ चांगल्या फॉर्मात नाही. चेन्नईने सहा सामन्यांपैकी केवळ दोन जिंकले आहेत. मागील सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने चेन्नईचा १० धावांनी पराभव केला.
एका क्रीडासंस्थेशी बोलताना सेहवाग म्हणाला, "कोलकाताने दिलेले आव्हान चेन्नईने गाठायला हवे होते. पण केदार जाधव आणि रवींद्र जडेजाने काम खराब केले. मला वाटते की चेन्नई सुपर किंग्जचे फलंदाज संघाला सरकारी नोकरी म्हणून पाहतात. कामगिरी करो अथवा न करो, पगार येत राहिल, असे त्यांना वाटते.''
कोलकाताच्या १६८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईचा संघ १५७ धावांपर्यंतच मजल मारू शकला. चेन्नईचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. चेन्नई सुपर किंग्जचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी शनिवारी होणार आहे.