नवी दिल्ली - भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांची प्रकृती खालावली असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या महिन्यात पीजीआयमध्ये दाखल झालेल्या चौहान यांना चिंताजनक प्रकृतीमुळे अचानक मेदांता रुग्णालयात दाखल केले गेले.
शनिवारी सायंकाळी चौहान यांची प्रकृती अचानक बिघडली. माध्यमांच्या वृत्तानुसार, मूत्रपिंडाच्या संसर्गामुळे अचानक त्यांची प्रकृती बिघडली. मेदांता हॉस्पिटल प्रशासनाने अद्याप त्यांच्या आजारपणाबद्दल कोणतीही औपचारिक माहिती शेअर केलेली नाही.
चेतन चौहान अमरोहा जिल्ह्यातील नौगावा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहे. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर ते राजकारणात सक्रिय भूमिका निभावत आहेत. सध्या ते योगी सरकारमधील सैनिक कल्याण, होमगार्ड, पीआरडी, नागरी संरक्षण विभागात मंत्री आहेत.
चेतन चौहान यांनी १९६९ मध्ये कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यांनी भारताकडून ४० कसोटी आणि ७ एकदिवसीय सामने खेळले आहेत. १९८१मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते.