अहमदाबाद - भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये २४ फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. हा सामना दिवस-रात्र पद्धतीने खेळला जाणार असून मोटेरा मैदानाच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंना मदत मिळेल, अशी आशा भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने व्यक्त केली आहे. तो रविवारी पत्रकारांशी बोलत होता.
रोहित शर्मा म्हणाला, 'मला मोटेरा आणि चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी सारखी वाटत आहे. चेन्नईप्रमाणेच मोटेरामध्ये देखील चेंडू टर्न होईल. आम्ही त्या नुसारच तयारी करत आहोत.'
मोटेराच्या सरदार पटेल स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे. यात मैदानाची प्रेक्षक क्षमता वाढवण्यासह अनेक सुविधा देण्यात आल्या आहेत. हे मैदान जगातील सर्वात मोठ्या प्रेक्षक क्षमतेचे मैदान असून या मैदानावर १ लाख १० हजार प्रेक्षक सामन्याचा आनंद घेऊ शकतात.
दरम्यान, उभय संघात चार सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नईमध्ये पार पडले. उर्वरित दोन्ही सामने अहमदाबादमध्ये होणार आहेत. चेन्नईत झालेल्या दोन सामन्यातील पहिला सामना इंग्लंडने तर दुसरा सामना भारताने जिंकला आहे. उभय संघातील मालिका सद्यस्थितीत १-१ अशा बरोबरीत आहे. या मालिकेच्या निकालावरून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा दुसरा फायनलिस्ट ठरणार आहे. न्यूझीलंडचा संघ आधीच कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
हेही वाचा - टीम इंडियात निवड झाल्यानंतर सूर्यकुमारची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला...
हेही वाचा - व्हिसाचे हमीपत्र लेखी द्या अन्यथा टी-२० विश्वकरंडक अमिरातीत खेळवण्याची मागणी करू - पाकिस्तान