ब्रिस्टल - इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने ६ गडी राखून पराभव केला. या सामन्यात षटकांची गती कायम न राखल्याने इंग्लंडचा कर्णधार इऑन मॉर्गनवर आयसीसीने मोठी कारवाई करत एका सामन्याची बंदी घातली आहे. तसेच तिसऱ्या सामन्यातील ४० टक्के मानधनाचा दंडही मॉर्गनला ठोठावण्यात आला आहे.
मॉर्गनवर करण्यात आलेल्या या कारवाईमुळे त्याला पाकिस्तानविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्याला मुकावे लागणार आहे. चौथा सामना नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज क्रिकेट मैदानावर १७ मे'ला खेळवण्यात येणार आहे.
इंग्लंड-पाकमध्ये खेळल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने ३५९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जॉनी बेअरस्टोचे धमाकेदार शतकाच्या जोरावार ४४.५ षटकांत ६ गडी राखून विजय मिळवला होता. या विजयासह इंग्लंडने ५ सामन्यांच्या या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता.