लंडन - इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) 1 ऑगस्टपासून व्यावसायिक पुरुष काऊंटी क्रिकेट हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हंगामातील उर्वरित सामन्यांचा निर्णय काऊंटी संघांच्या संमतीने जुलैच्या सुरुवातीला घेण्यात येईल आणि त्यानंतर एक नवीन वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे ईसीबीने सांगितले.
महिला एलिट घरगुती स्पर्धा ही पुरुष काऊंटी सेटअपच्या बरोबरीची आणि आठ विभागांनी बनलेली आहे. कोरोनाच्या काळात नवीन स्पर्धेसाठी एक नवीन चौकट तयार करणे खूप अवघड आहे. महिला आणि पुरुषांच्या घरगुती हंगामासाठी नियोजन करणे, हे सरकार आणि आरोग्य तज्ञांच्या सल्ल्यावर अवलंबून असेल.
ईसीबीने पुरूष खेळाडूंना प्रशिक्षण सुरू करण्यासाठी जुलैची तारीखही निश्चित केली आहे. "आमचा पुरुष हंगाम खेळासाठी महत्त्वाची पायरी आहे. हंगामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात करण्यास आम्ही तयार आहोत. काऊंटी क्रिकेटशी संबंधित प्रत्येकजण या निर्णयाचे स्वागत करेल. यासाठी 18 प्रथम श्रेणी काऊंटी संघ, व्यावसायिक क्रिकेट संघटना आणि ईसीबी यांच्यात चर्चा झाली आहे. चर्चेत आमचे खेळाडू, कर्मचारी आणि अधिकारी यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले आहे. सरकारच्या टिप्पण्यानुसार आम्ही आमची रणनीती आणि तयारी सुरू करू", असे ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन म्हणाले आहेत.