मँचेस्टर - ओल्ड ट्रॅफर्ड येथे सुरू असलेल्या पाकिस्तानविरूद्धच्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने ४ बाद ९२ धावा केल्या आहेत. गोलंदाज मोहम्मद अब्बासच्या दोन तर, शाहिन आफ्रिदी आणि यासिर शाहच्या प्रत्येकी एक बळीच्या जोरावर पाकिस्तानने इंग्लंडच्या फलंदाजांवर वर्चस्व राखले. खेळ थांबला तेव्हा इंग्लडकडून ओली पोप ४६, तर जोस बटलर १५ धावांवर खेळत होते.
तत्पूर्वी, पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर शान मसूदच्या १६६ धावांच्या जोरावर पाकिस्तानने पहिल्या डावात ३२६ धावा केल्या. २ बाद १३९ धावांवरून पाकिस्तानने दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. पाकिस्तानचा दिग्गज फलंदाज बाबर आझमने ६९ धावांची खेळी करत सलामीवीर मसूदला उत्तम साथ दिली. मसूदने ३१९ चेंडूत १८ चौकार आणि २ षटकार ठोकत कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी नोंदवली. हे मसूदच्या कारकिर्दीचे चौथे आणि सलग तिसरे शतक आहे.
शतक पूर्ण केल्यावर मसूदने शादाबच्या साथीने सहाव्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. या भागीदारीत शादाबनेही ४५ धावा केल्या. इंग्लंडकडून पहिल्या डावात जोफ्रा आर्चरने आणि स्टुअर्ट ब्रॉडने ३, ख्रिस वॉक्सने २, जेम्स अँडरसन व डोमिनिक बेसने प्रत्येकी एक गडी बाद केला.