चेन्नई - भारतात पोहोचल्यानंतर इंग्लंड क्रिकेट संघातील खेळाडूंची कोरोना चाचणी घेण्यात आली. यात सर्व खेळाडूंचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. २७ जानेवारीपासून इंग्लंडचे खेळाडू क्वारंटाइन कालावधीत होते. आता हा कालावधी संपल्यानंतर त्यांना मंगळवारपासून पूर्ण संघासह सराव करण्याची परवानगी मिळाली आहे. उद्या दुपारी २ ते ५ पर्यंत पाहुणा संघ चेन्नईच्या एम. चिदम्बरम स्टेडियमवर सराव करेल.
इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) या चाचणीबाबत माहिती दिली. ५ फेब्रुवारीपासून इंग्लंड आणि भारत यांच्यात पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. चार कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने चेन्नईत तर, उर्वरित सामने अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियममध्ये खेळवले जातील.
हेही वाचा - टीम इंडियाच्या ऐतिहासिक कामगिरीची अर्थमंत्र्यांकडून दखल, म्हणाल्या...
आतापर्यंत फक्त जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स आणि रोरी बर्न्स हे संघातील उर्वरित सदस्य भारतात आधी पोहोचल्यामुळे प्रशिक्षण घेत होते. श्रीलंका दौऱ्यावर हे तिघेही संघात नव्हते. इंग्लंडचा संघ भारताबरोबर चार कसोटी, पाच टी-२० आणि तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे.
दुसऱ्या सामन्यात ५० टक्के प्रेक्षकांना परवानगी -
बीसीसीआयआणि तमिळनाडू क्रिकेट असोसिएशनने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ५० टक्के प्रेक्षकांना चिदम्बरम स्टेडियमवर येण्याची परवानगी दिली आहे. तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, स्टेडियममधील प्रेस बॉक्समधून माध्यमांनाही सामना कव्हर करण्याची परवानगी दिली जाईल.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी इंग्लंडचा संघ - जो रूट, जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स अँडरसन, डोम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जेक क्रॉले, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, बेन स्टोक्स, अॅली स्टोन, ख्रिस वोक्स.