मँचेस्टर - दुसर्या कसोटी सामन्यात इंग्लंडने वेस्ट इंडिजला 113 धावांनी नमवत आपले अनेक विक्रम सुधारले आहेत. तीन कसोटी सामन्यांची मालिका आता 1-1 अशी बरोबरीत असून निर्णायक सामन्यात कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पहिल्या कसोटीप्रमाणेच या सामन्यातही विक्रम नोंदवले गेले. वाचा विक्रम -
बेन स्टोक्स आठव्यांदा सामनावीर -
आपल्या कारकीर्दीतील 65 वा कसोटी सामना खेळलेल्या बेन स्टोक्सने आठव्यांदा सामनावीराचा पुरस्कार जिंकला. या सामन्यात स्टोक्सने पहिल्या डावात 176 आणि दुसऱ्या डावात नाबाद 78 धावा केल्या. शिवाय, 3 बळीही घेतले.
ओल्ड ट्रॅफर्ड आणि नाणेफेक -
ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर नाणेफेक जिंकणार्या संघाने क्षेत्ररक्षणाची निवड केली तर तो संघ आजपर्यंत जिंकू शकला नाही. अशावेळी हा सामना अनिर्णित होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. या मैदानावर आतापर्यंत खेळल्या गेलेल्या आणि नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलेल्या 9 सामन्यांपैकी 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. तर दोन वेळा क्षेत्ररक्षण निवडलेल्या संघाला पराभव पत्करावा लागला आहे.
विंडीज आणि कसोटीचा पाचवा दिवस -
विंडीजच्या कसोटी इतिहासातील ही सहावी वेळ आहे, जेव्हा सामन्याच्या पाचव्या दिवशी त्यांनी दुसर्या डावाची सुरुवात केली आणि तरीही त्यांना सामना गमवावा लागला. या संदर्भात इंग्लंडने त्यांना दुसऱ्यांदा पराभूत केले आहे. 1963 मध्ये एजबस्टन येथे इंग्लंडने विंडीजला हरवले होते.
सॅम करनची जादू -
22 वर्षीय सॅम करनने आपल्या कारकीर्दीतील हा 18 वा कसोटी सामना खेळला. सॅम करन संघात असताना इंग्लंडने घरच्या मैदानावर खेळलेले सर्व कसोटी सामने जिंकले आहेत. घरच्या मैदानावर सलग 8 कसोटी सामने जिंकणारा तो इंग्लंडचा सहावा खेळाडू ठरला आहे. सॅमच्या आधी केन ब्रिंग्टन, मायकेल स्मिथ, अँड्र्यू स्ट्रॉस, गेराइंट जॉन्स आणि टिम ब्रेस्नन या यादीत आहेत.
इंग्लंडचा विंडीजवर 50 वा विजय -
कसोटी क्रिकेटमध्ये या दोन संघांमधील हा 159 वा सामना होता. इंग्लंडच्या संघाने हा सामना जिंकून वेस्ट इंडिजवर आपला 50 वा विजय नोंदवला. इंग्लंडने 351 कसोटी सामने खेळून विंडीजला 110 वेळा पराभूत केले आहे.