लंडन - इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरने 'ब्लक लाइव्ह्स मॅटर' मोहिमेला पाठिंबा देत वांशिक अत्याचाराच्या पीडितांशी बोलण्याचे आवाहन केले आहे. जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा अमेरिकेत पोलीस कारवाईदरम्यान मृत्यू झाल्यानंतर संपूर्ण अमेरिकेसह जगभरात मोर्चे आणि आंदोलने सुरू झाली. ऑस्ट्रेलियामध्येही विविध ठिकाणी 'ब्लॅक लाइव्ह्स मॅटर' नावाने निदर्शने करण्यात आली. त्यानंतर लंडन येथेही आंदोलने सुरू झाली आहेत.
आर्चर म्हणाला, ''जर कोणी तुम्हाला त्रास देत असेल तर एक व्यक्ती म्हणून मी नेहमीच बोलण्याचे समर्थन केले आहे. माझे वैयक्तिक मत आहे की आपण कधीही गोष्टी बाटलीत बंद करून ठेऊ नयेत. कारण वर्णद्वेष ठीक नाही." गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात आर्चर स्वत: वर्णद्वेषी वक्तव्याचा बळी ठरला होता. त्यानंतर, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संबंधित व्यक्तीवर कारवाई केली होती.
आर्चर पुढे म्हणाला, "ब्लॅक लाइव्ह्स मॅटर मोहीम सूरू झाली याचा मला आनंद झाला. आपण सर्व एकाच देशात राहतो. तुम्ही ब्रिटिश असाल तर इतरांसारखा तुम्हालाही खेळण्याचा तितकाच हक्क आहे. माझ्याकडे एक फोटो आहे, ज्यात 2019 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यादरम्यान मी, जोस बटलर आणि आदिल रशीद आनंद साजरा करताना दिसत आहे. हा फोटो आमच्या संघाबद्दल सर्व काही सांगून जातो.''
वाचा नक्की प्रकरण काय -
जॉर्ज फ्लॉइडला अटक करत असताना, एक पोलीस अधिकाऱ्याने त्याच्या मानेवर 8 मिनिटे 48 सेंकद गुडघा ठेवला होता. जॉर्ज त्याला तो गुडघा काढण्यासाठी आर्जव करत होता, "मला श्वास घेता येत नाही, कृपया माझा जीव घेऊ नका," असे जॉर्ज म्हणत होता. मात्र, पोलिसाने त्याच्या विनवण्या ऐकल्या नाहीत, आणि जॉर्जचा मृत्यू झाला. या सर्व प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर जगभरात वातावरण तापले आहे.