मुंबई - इंग्लंडविरुद्धचा तिसरा टी-२० सामना ५ धावांनी जिंकत पाकिस्तानने ३ सामन्याची मालिका १-१ ने बरोबरीत राखली. अखेरच्या सामन्यातील पाकच्या विजयात अनुभवी मोहम्मद हाफिज, वहाब रियाज यांच्यासह १९ वर्षीय हैदर अलीने मोलाची भूमिका पार पाडली. हाफिजने ५२ चेंडूत नाबाद ८६ धावांची खेळी केली. तर वहाबने मोक्याच्या क्षणी गडी टिपले. याशिवाय पहिलाच टी-२० सामना खेळत असलेल्या हैदर अलीने ३३ चेंडूत ५४ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. त्याने हाफिजसोबत तिसऱ्या गड्यासाठी १०० धावांची भागिदारी रचली. दरम्यान, अर्धशतकी खेळी करणाऱ्या या युवा खेळाडूच्या नावे एक विक्रम प्रस्थापित झाला आहे. विशेष म्हणजे, हैदर अलीसारखा कारनामा विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनाही करता आलेला नाही.
हैदर अलीने पहिल्याच आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यात अर्धशतक झळकावले. अशा पराक्रम करणारा तो पाकिस्तानचा पहिला फलंदाज ठरला आहे. हैदरने ५ चौकार आणि २ षटकारांसह अर्धशतकी खेळी साकारली. भारताचा विराट कोहली, रोहित शर्मा यांनाही आपल्या पदार्पणाच्या पहिल्या सामन्यात अर्धशतक झळकवता आलेले नाही. विराट पदार्पणाच्या सामन्यात २६ धावांवर बाद झाला होता. तर रोहितला पदार्पणाच्या सामन्यात फलंदाजीच मिळालेली नव्हती. भारताकडून पदार्पणाच्या टी-२० सामन्यात अर्धशतक केवळ अजिंक्य रहाणेने झळकावले होते.
दरम्यान, पाकिस्तान सुपर लीगमध्ये चांगली कामगिरी केल्याने हैदर अलीला पाकिस्तान संघात संधी मिळाली. हैदर अलीने पीएसएलच्या २०२० च्या हंगामातील ९ सामन्यात खेळताना २३९ धावा केल्या होत्या. विशेष बाब म्हणजे, पीएसएलमध्ये त्याचा स्ट्राईट रेट १५८.२७ इतका होता. याआधी त्याने अंडर-१९ विश्वकरंडक स्पर्धेत भारताविरुध्द उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळताना ५६ धावांची खेळी केली होती.
हेही वाचा - CSK माझा परिवार, धोनी माझ्यासाठी सर्व काही; रैनाने दिले IPL मध्ये परतण्याचे संकेत