मुंबई - इंग्लंडविरुद्धच्या टी-२० सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने, विराट कोहली आणि अरॉन फिंच यांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे. बाबरने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात ४४ चेंडूत ५६ धावांची खेळी साकारली. या धावांसह त्याने टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५०० धावांचा टप्पा पार केला.
बाबर आझमच्या आधी टी-२० क्रिकेटमध्ये १५०० धावांचा टप्पा विराट कोहली आणि अरॉन फिंच यांनी पार केला आहे. या दोघांनी ३९ डावात खेळताना हा टप्पा पार केला होता. बाबर आझमनेही ३९ डावात हा विक्रम केला. त्याने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात ४४ चेंडूत ७ चौकारांच्या मदतीने ५६ धावा केल्या.
दरम्यान, इंग्लंडने पाकिस्तानविरुद्धचा दुसरा टी-२० सामना ५ गडी राखून जिंकला. प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने बाबर आझम (५६) आणि मोहम्मद हाफिज (६९) यांच्या अर्थशतकांच्या जोरावर २० षटकात ४ बाद १९५ धावा, धावफलकावर लावल्या. इंग्लंड कर्णधार इयॉन मार्गन आणि डेव्हिड मलान यांनी धडाकेबाज खेळी करत संघाला शेवटच्या षटकात विजय मिळवून दिला.
मॉर्गनने ३३ चेंडूत ६ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने ६६ धावांची खेळी केली. तर मलानने नाबाद ५४ धावा केल्या. त्याच्या या खेळीत ६ चौकार आणि १ षटकाराचा समावेश आहे. इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येत आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसऱ्या सामन्यात इंग्लंडने पाकवर ५ गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० ने आघाडी घेतली. अखेरचा सामना १ सप्टेंबरला मँचेस्टरच्या मैदानात खेळला जाणार आहे.