लंडन - इंग्लंड अॅण्ड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) 'द हंड्रेड' स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंचा करार रद्द केला आहे. ही नवीन स्पर्धा यापूर्वीच पुढे ढकलण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात, ईसीबीने द हंड्रेडचा पहिला हंगाम पुढील वर्षापर्यंत तहकूब केला होता. 100 चेंडूंची ही स्पर्धा आठ संघांदरम्यान खेळली जाणार आहे.
यासाठी, आठही पुरुष संघांनी आपले खेळाडू निवडले होते. तर, महिला खेळाडूंची निवड बाकी होती. आता लीगला एक वर्ष उशीर होत असल्याने बोर्डानेही खेळाडूंचा करार संपुष्टात आणला आहे. ईसीबीच्या निवेदनात म्हटले आहे, की आम्ही पुष्टी करतो की करार रद्द करण्यासाठी सर्व खेळाडूंना पत्र पाठवण्यात आले आहे.
या पत्राद्वारे कायदेशीररीत्या खेळाडूंना परिस्थितीबद्दल माहिती देणे आवश्यक होते. कोरोनामुळे सर्व क्रियाकलाप थांबवण्यात आले असून ही स्पर्धा एका वर्षासाठी पुढे ढकलण्यात आली आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये ही स्पर्धा होणार होती.