दुबई - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होत आहे. हैदराबादचे प्ले ऑफ फेरीचे भवितव्य मात्र अधांतरी आहे. पण त्यांच्यासाठी आजचा सामना 'करा किंवा मरा' अशा स्थितीतील आहे. तर दिल्लीचा आजचा सामना जिंकून प्ले ऑफ फेरीमधील स्थान पक्के करण्याचा निर्धार असणार आहे.
श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या दिल्लीने स्पर्धेची सुरूवात धडाक्यात केली. पण कोलकाता आणि पंजाब या दोन संघांकडून लागोपाठच्या सामन्यांमध्ये पराभव पत्करल्यामुळे दिल्लीच्या विजयी प्रवासाला धक्का बसला. परंतु गुणतालिकेत आणखी दोन गुणांची भर घालत ते १६ गुणांनिशी प्ले ऑफ फेरीमधील स्थान निश्चित करू शकतात.
दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादने ११ सामन्यांत फक्त आठ गुणाची कमाई केली आहे. गुणतालिकेत ते सातव्या स्थानावर आहे. बाद फेरीस पात्र होण्यासाठी त्यांना राहिलेल्या तिन्ही सामन्यांमधील विजयांसह अन्य निकालांचीही प्रतीक्षा करावी लागणार आहे.
दिल्लीचा समतोल संघ -
दिल्लीकडे शिखर धवन, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, मार्कस स्टायनिस, शिमरोन हेटमायर या स्फोटक फलंदाजांची फळी आहे. पण सलामीवीर पृथ्वी शॉ अपेक्षेनुरूप कामगिरी करण्यात अपयशी ठरू लागल्याने कोलकाताविरुद्ध अजिंक्य रहाणेला संधी देण्यात आली. परंतु रहाणेला भोपळाही फोडता आला नाही. कॅगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्किया हे वेगवान गोलंदाज टिच्चून गोलंदाजी करीत आहे. त्यांना तुषार देशपांडे, रविचंद्रन अश्विन आणि अक्षर पटेल यांची चांगली साथ मिळत आहे. कोणत्याही एका खेळाडूवर हा संघ विसंबून नाही.
हैदराबाद वॉर्नर-बेअरस्टो जोडीवर निर्भर -
दुसरीकडे, हैदराबादचा संघ पंजाबविरूद्धच्या सामन्यात १२७ धावांचे माफक लक्ष्य गाठू शकला नाही. सलामीवीर वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो बाद झाल्यानंतर हैदराबादचा डाव ११४ धावांत कोसळला. या संघाने १७ धावांत ७ गडी गमावले. बेअरस्टो, वॉर्नर आणि मनीष पांडे यांच्यावर हैदराबादच्या फलंदाजीची प्रमुख धुरा आहे. राजस्थानविरुद्धच्या विजयात विजय शंकरने चमकदार कामगिरी केली होती. परंतु पंजाबविरुद्ध तो अपयशी ठरला. जेसन होल्डरच्या समावेशामुळे हैदराबादच्या गोलंदाजीचा मारा मजबूत झाला आहे.