दुबई - आयपीएल २०२०मध्ये आज सायंकाळी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कारण दोन्ही संघांचे प्रत्येकी १० सामन्यांतून ८ गुण असल्याने बाद फेरीच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय अत्यावश्यक आहे. एकीकडे, पंजाबच्या संघाने अव्वल टॉप-३ संघांना पराभवाची धूळ चारत सलग ३ विजय मिळवले आहेत. तर दुसरीकडे, हैदराबादने डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांच्या अपयशानंतरही राजस्थान रॉयल्सला सहज धूळ चारली आहे.
पंजाबने मागील ३ सामन्यांत अव्वल संघाना केलयं पराभूत -
केएल राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाबने सलग तीन सामने जिंकले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी गुणतालिकेत अव्वल असलेले मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या बलाढ्य संघाने पराभव केलं आहे. विशेष बाब म्हणजे, पंजाबने हे तीनही सामने ख्रिस गेलचे संघात आगमन झाल्यापासून जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमालीचा उंचावला असून हैदराबादविरुद्ध सुद्धा ते त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यासाठी उत्सुक असतील. राहुल, मयांक अगरवाल या भारतीय जोडीबरोबरच विंडीजच्या गेल-निकोलस पूरन यांच्या स्वरूपात त्यांच्याकडे धडाकेबाज फलंदाजही उपलब्ध आहेत. त्याशिवाय ग्लेन मॅक्सवेलही पुन्हा लयीत परतला आहे. गोलंदाजी मोहम्मद शमी भेदक मारा करत आहे. ख्रिस जॉर्डनच्या जागी पुन्हा शेल्डन कॉट्रेलला पंजाब संधी देणार का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. रवी बिश्नोई आणि मुरुगन अश्विन फिरकीची बाजू समर्थपणे सांभाळत आहेत.
राजस्थानचा पराभव करत हैदाराबादने कमावले २ गुण -
हैदराबादने मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सचा ८ गडी राखून सहज पराभव केला होता. महत्वाचे म्हणजे, या सामन्यात डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो अपयशी ठरले. तेव्हा मनीष पांडे आणि विजय शंकर या जोडीने हैदराबादला विजय मिळवून दिला. या दोघांचा गवसलेला सूर हैदराबादच्या दृष्टीने जमेची बाजू आहे. केन विल्यमनच्या तंदुरुस्तीबाबत अद्याप संभ्रम कायम असल्याने तो खेळणार की नाही, हे या विषयी संशांकता आहे. जेसन होल्डरच्या समावेशामुळे हैदराबादची गोलंदाजी बळकट झाली आहे. यासोबत टी. नटराजनदेखील भेदक मारा करत आहे. याशिवाय राशिद खान हैदराबादचा हुकमी एक्का आहे.
हेड टु हेड रेकॉर्ड -
उभय संघातील हेड टु हेड आकडेवारी पहिल्यास दोन्ही संघामध्ये आजघडीपर्यंत १५ सामने झाले आहेत. यात हैदराबादने ११ सामने जिंकले आहेत. तर अवघ्या ४ सामन्यात पंजाबला आपला विजय साकारता आला आहे. ही आकडेवारी पाहिल्यास हैदराबादचा संघ पंजाबवर वरचढ असल्याचे दिसून येते.