शारजाह - आयपीएलच्या तेराव्या हंगामात आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे. विराटच्या नेतृत्वात आरसीबीने मागील सामन्यात चेन्नईवर विजय मिळवला होता. तर कोलकाताने पंजाबविरुद्ध अखेरच्या चेंडूवर विजय साकारला होता. शारजाहचे मैदानात आकाराने छोटे असून या मैदानावर दोन तुल्यबळ संघात सामना होत असल्याने, आजच्या सामन्यात चौकार-षटकारांचा पाऊस क्रिकेटप्रेमींना पाहायला मिळू शकतो.
कोलकाताचा सलग दोन विजयामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. मागील सामन्यात दिनेश कार्तिकला सूर गवसला आहे. त्याने पंजाबविरुद्धच्या सामन्यात अर्धशतक झळकावले होते. शुबमन गिल, राहुल त्रिपाठी, इयॉन मॉर्गन आणि नितिश राणा देखील फार्मात आहेत. पण त्यांच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. स्फोटक आंद्रे रसेल आपल्या लौकिकास पात्र कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजीत केकेआरच्या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये चांगली गोलंदाजी केली आहे.
दुसरीकडे आरसीबीचा कर्णधार विराट कोहलीला सूर गवसला आहे. त्याने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात नाबाद ९० धावांची खेळी साकारली होती. याशिवाय सलामीवीर फलंदाज देवदत्त पडीक्कल देखील सातत्याने धावा करत आहे. पण पडीक्कल वगळता अन्य फलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता आले नाही. अॅरोन फिंच व एबी डिव्हिलियर्स सूर गवसण्यासाठी संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. गोलंदाजीमध्ये युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर शानदार फॉर्मात आहेत. ख्रिस मॉरिसच्या समावेशामुळे आरसीबीची गोलंदाजीची बाजू मजबूत झाली आहे.
- कोलकाता नाइट राइडर्सचा संघ -
दिनेश कार्तिक (कर्णधार ), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वारियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नरेन, पॅट कमिंन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटन, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाइक
- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ -
विराट कोहली (कर्णधार), एबी डिव्हिलियर्स, पार्थिव पटेल, अॅरोन फिंच, जोश फिलिप, ख्रिस मॉरिस, मोइन अली, मोहम्मद सिराज, शाहबाज अहमद, देवदत्त पडिक्कल, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, डेल स्टेन, पवन नेगी, शिवम दुबे, उमेश यादव, गुरकीरत सिंह मान, वॉशिंग्टन सुंदर, पवन देशपांडे आणि अॅडम झम्पा.