दुबई - आयपीएल २०२० मध्ये आज कोलकाता नाइट रायडर्सचा सामना सुसाट फॉर्मात असलेल्या राजस्थान रॉयल्सशी होणार आहे. पहिल्या दोन्ही विजयात राजस्थानने द्विशतकी धावसंख्या उभारत चार गुणांची कमाई केली आहे. राजस्थानची ही घोडदौड रोखण्यासाठी कोलकात्याला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. राजस्थान आज विजय मिळवून विजयाची हॅट्ट्रिकच्या प्रयत्नात आहे. तर दुसरीकडे कोलकाता दुसऱ्या विजयासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यास इच्छुक आहे.
स्टिव्ह स्मिथच्या नेतृत्वात राजस्थान रॉयल्सने आयपीएलच्या तेराव्या हंगामात सलग दोन विजय मिळवले आहेत. महत्वाची बाब म्हणजे, राजस्थानने दोन्ही विजयात २०० धावांचा टप्पा पार केला आहे. यामुळे त्यांचा आत्मविश्वास सर्वोच्च शिखरावर आहे. फलंदाजीत कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, हरियाणाचा अष्टपैलू राहुल तेवतिया यांची बॅट तळपली आहे. पण जोस बटलरला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. गोलंदाजीत जोफ्रा ऑर्चरसह टॉम करन, श्रेयश गोपाल चांगली कामगिरी करत आहेत.
दुसरीकडे राजस्थानच्या अवघड आव्हानाला सामोरे जाताना कोलकाता नाइट रायडर्सची प्रमुख मदार आंद्रे रसेल आणि इयॉन मॉर्गन यांच्यावर आहे. अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरणाऱ्या या दोन्ही खेळाडूंना आतापर्यंत मर्यादित संधी मिळाली आहे. याशिवाय मागील सामन्यात नाबाद अर्धशतक झळकावणाऱ्या शुबमन गिलला सातत्याने धावा कराव्या लागणार आहेत. कर्णधार दिनेश कार्तिकचा फॉर्म केकेआरसाठी डोकेदुखी ठरत आहे. केकेआरच्या गोलंदाजीची भिस्त पॅट कमिन्स, कुलदीप यादव, सुनिल नरेन, शिवम मावी यांच्यावर आहे.
- कोलकाता नाइट राइडर्सचा संघ -
- दिनेश कार्तिक (कर्णधार आणि यष्टीरक्षक), आंद्रे रसेल, कमलेश नागरकोटी, कुलदीप यादव, लॉकी फर्ग्यूसन, नितीश राणा, प्रसिद्ध कृष्णा, रिंकू सिंह, संदीप वॉरियर, शिवम मावी, शुभमन गिल, सिद्धेश लाड, सुनील नारायण, पॅट कमिंन्स, इयॉन मॉर्गन, वरुण चक्रवर्ती, टॉम बँटन, राहुल त्रिपाठी, ख्रिस ग्रीन, एम सिद्धार्थ, निखिल नाइक आणि अली खान.
- राजस्थान रॉयल्सचा संघ -
- स्टिव्ह स्मिथ (कर्णधार), जोस बटलर, रॉबिन उथप्पा, संजू सॅमसन, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर, यशस्वी जैस्वाल, मनन वोहरा, कार्तिक त्यागी, आकाश सिंह, ओशन थॉमस, अँड्रयू टाय, डेव्हिड मिलर, टॉम करन, अनिरुद्ध जोशी, श्रेयस गोपाल, रियान पराग, वरुण आरोन, शशांक सिंह, अनुज रावत, महिपाल लोमरोर आणि मयांक मारकंडे.