नवी दिल्ली - विजय हजारे ट्रॉफी एकदिवसीय स्पर्धेतील बाद फेरीतील सामन्यांचे आयोजन दिल्लीत करण्यात आले आहे. दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (डीडीसीए) अधिकाऱ्याने सांगितले की, अरुण जेटली स्टेडियम आणि पालम मैदानावर बाद फेरीतील सामने खेळले जातील. विजय हजारे ट्रॉफीचे लीग सामने अद्याप खेळले जात आहेत, तर बाद फेरीतील सामने ७ मार्चपासून रंगणार आहेत.
तथापि, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे घरगुती सामने खेळवण्याची परवानगी नव्हती. परंतु बीसीसीआय आणि डीडीसीएला विश्वास आहे की हे सामने कोणत्याही अडचणीशिवाय खेळवण्यात येतील.
अधिकाऱ्याने सांगितले की, दिल्लीत काही अडचण होईल असे आम्हाला वाटत नाही. आम्हाला खात्री आहे की सामने सहजतेने आयोजित केले जातील. दिल्लीतील बाद फेरीतील सामन्यांमध्ये एलिमिनेटर, चार उपांत्यपूर्व, दोन उपांत्य आणि अंतिम सामना असेल. या संघांना २ मार्चपर्यंत दिल्लीत येण्यास सांगण्यात आले आहे. विजय हजारे ट्रॉफीचा अंतिम सामना १४ मार्च रोजी खेळला जाईल.