दुबई - आज दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात आयपीएलच्या तेराव्या पर्वाचा दुसरा सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी, दिल्ली कॅपिटल्सचा प्रमुख वेगवान गोलंदाज इशांत शर्मा जखमी झाला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यासाठी इशांतच्या उपस्थितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात ही लढत रंगणार आहे. दोन युवा कर्णधार, विजयी श्रीगणेशा करण्यासाठी मैदानात उतरतील. श्रेयस अय्यर दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे, तर लोकेश राहुलकडे किंग्जची धुरा आहे.
या सामन्यापूर्वीच्या सराव सत्रात इशांत जखमी झाला होता. इशांतला पाठीची दुखापत झाली आहे. यावर्षी जानेवारीत इशांतच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती. एका महिन्यानंतर तो न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत परतला, पण तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला.
दिल्लीच्या संघात इशांतशिवाय हर्षल पटेल, मोहित शर्मा आणि आवेश खान हे भारतीय वेगवान गोलंदाज आहेत. इशांतच्या अनुपस्थितीत या तिघांंपैकी एकाला खेळण्याची संधी मिळू शकते. या सामन्याला सायंकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल. सामन्याच्या अर्धातास आधी नाणेफेक होईल.