लंडन - विश्वकरंडक स्पर्धेत पहिल्या दोन्ही सामन्यात पराभव पाहणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी एक वाईट बातमी आहे. दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेन जखमी झाल्याने तो पूर्ण विश्वकरंडक स्पर्धेतून बाहेर पडला आहे. स्टेन विश्वकरंडकात खेळणार नसल्याचे वृत्त आयसीसीने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून दिले आहे.
आजवर एकदाही विश्वकरंडक स्पर्धा न जिंकलेल्या दक्षिण आफ्रिकेला आता उर्वरीत स्पर्धा प्रमुख गोलंदाज डेल स्टेनविनाच खेळावी लागणार असल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. स्टेनच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज ब्युरोन हॅन्ड्रिक्सला दक्षिण आफ्रिकेच्या संघात स्थान देण्यात आले आहे. यापूर्वी खेळल्या गेलेल्या आयपीएलमधूनही स्टेन फक्त २ सामने खेळून बाहेर पडला होता.
दक्षिण आफ्रिकेला विश्वकरंडकाच्या सलामीच्या लढतीत इंग्लंडकडून तर दुसऱ्या सामन्यात बांगलादेशकडून धक्कादायक पराभवास सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेतील द. आफ्रिकेचा तिसरा सामना हा उद्या (५ जूनला) भारतीय संघाशी होणार आहे.