विशाखापट्टणम - आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळल्या गेलेल्या क्वॉलिफायर-२ सामन्यात चेन्नईने विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. दिल्लीने विजयासाठी दिलेल्या १४८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना शेन वॉटसन (५०) आणि फाफ डय़ू प्लेसिस (५०) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर १९ व्या षटकांमध्ये ६ विकेट राखून चेन्नईने विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.
चेन्नईच्या भेदक गोलंदाजीपुढे दिल्लीच्या फलंदाजांना लोटांगण घालावे लागले. दिल्लीकडून ऋषभ पंत आणि कॉलिन मुनरो वगळता एकाही फलंदाजाला चेन्नईच्या गोलंदाजांसमोर टिकता आले नाही. चेन्नईसाठी दिपक चहर, रविंद्र जाडेजा, हरभजन सिंह आणि ड्वेन ब्राव्हो यां गोलंदाजांनी प्रत्येकी २ तर इम्रान ताहीरने १ विकेट घेतला. दिल्लीसाठी ऋषभ पंतने सर्वाधिक ३८ धावा केल्या होत्या.
दिल्ली कॅपीटल्सने या सामन्यासाठी संघात कोणताही बदल केला नव्हता. तर चेन्नईच्या संघाने मुरली विजयच्या जागी शार्दुल ठाकूरला संघात स्थान दिले होते. आता अंतिम फेरीत आयपीएलच्या विजेतेपदासाठी चेन्नईचा सामना मुंबईशी होईल. चेन्नई आणि मुंबई या संघानी प्रत्येकी तीन वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे.
आजच्या सामन्यासाठी अशी होती दोन्ही संघाची Playing XI
- दिल्ली कॅपिटल्स - श्रेयस अय्यर (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), कॉलिन मुनरो, पृथ्वी शॉ, इशांत शर्मा, शिखर धवन, शेरफाने रुदरफोर्ड, ट्रेंट बोल्ट, अक्षर पटेल, अमित मिश्रा, किमो पॉल.
- चेन्नई सुपर किंग्ज - महेंद्रसिंह धोनी (कर्णधार-यष्टीरक्षक), सुरेश रैना, अंबाती रायुडू, शेन वॉटसन, फाफ डय़ू प्लेसिस, शार्दुल ठाकूर, ड्वेन ब्राव्हो, इम्रान ताहीर, हरभजन सिंग, रवींद्र जडेजा, दीपक चहर.