मुंबई - भारतीय संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग यांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. एका व्यावसायिकाने हरभजनला चार कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. त्यामुळे हरभजनने चेन्नई सिटी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे.
एका इंग्रजी माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, हरभजनने एका मित्राच्या मध्यस्थीवरुन, व्यावसायिक जी. महेश याला २०१५ मध्ये चार कोटी रुपयांचे कर्ज दिले होते. कालावधी संपल्यानंतर हरभजनने महेशकडे पैसे परत मागण्याचा प्रयत्न केला. तेव्हा महेशने मागील महिन्यात हरभजनला २५ लाख रुपयांचा चेक दिला.
हरभजनने तो चेक बँकेत जमा केला असता, महेशच्या खात्यात पैसे नसल्याने तो चेक बाऊन्स झाला. यानंतर हरभजनने महेशला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याने हरभजनला काहीच उत्तर दिले नाही. त्यामुळे हरभजनने चेन्नई पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर पोलिसांनी गणेशला समन्सही बजावले आहेत.
दुसरीकडे, महेशने प्रतिज्ञापत्र सादर करत आपण हरभजनकडून कर्ज घेतले आणि त्यासाठी एक प्रॉपर्टी तारण म्हणून ठेवलेली आहे. असे सांगितलं. तसेच त्याने, मी हरभजनचे सर्व पैसे परत करेन, असे म्हटलं आहे. दरम्यान, हरभजन कौटुंबिक कारणामुळे आयपीएलच्या १३ व्या हंगामात खेळणार नाही. तो आपल्या कुटुंबासह पंजाबमध्ये राहत आहे.
हेही वाचा - प्रेमाच्या खेळपट्टीवर पृथ्वी शॉ 'क्लिन बोल्ड', 'या' अभिनेत्रीला करतोय डेट?
हेही वाचा - जगातील सर्वोत्तम विमानांना, बेस्ट पायलट मिळाले; धोनीने केले वायुसेनेचे अभिनंदन