बंगळुरू - भारतीय क्रिकेटपटू लोकेश राहुलने हिटमॅन रोहित शर्माचे कौतुक केले आहे. रोहित माझ्यासाठी नेहमी उभा राहिला, असे राहुलने सांगितले. लोकेश राहुलने टीम इंडियासाठी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. सलामी फलंदाजी ही ताकद असल्याचे राहुलने आधीच स्पष्ट केले होते. शिखर धवनच्या अनुपस्थितीत त्याने संघासाठी सलामी दिली आहे.
टी-20 संघात राहुलने संघात स्थान पक्के केले असल्याचे रोहित म्हणाला होता. यावर प्रतिक्रिया देताना राहुल म्हणाला, ''रोहितचे बोलणे ऐकून छान वाटले. मी त्याच्या फलंदाजीचा खूप मोठा चाहता आहे. मी काही वर्षे त्याच्याबरोबर खेळलो. जे लोकं सचिन तेंडुलकरची फलंदाजी पाहून चकित होतात, तशीच भावना माझी रोहितसाठी आहे. त्याच्यासाठी शब्द नाहीत.''
संघात आणि संघाबाहेर असताना रोहितने आत्मविश्वास वाढवण्यात कशी मदत केली हेही राहुलने सांगितले. राहुल म्हणाला, "रोहित माझ्यावर विश्वास ठेवतो. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून मी त्याला पाहिले आहे. त्याने मला साथ दिली आहे. तो संघातील वरिष्ठ खेळाडूंपैकी आहे, जो जबाबदारी घेतो. त्याच्यामुळे युवा खेळाडूंना आत्मविश्वास मिळतो."