ख्राईस्टचर्च - पहिल्या कसोटीतील खराब फलंदाजीनंतर दुसऱ्या कसोटीतही भारतीय फलंदाज धावा रचण्यात अपयशी ठरले आहेत. ख्राईस्टचर्च येथे आजपासून सुरू झालेल्या अंतिम आणि दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात भारतीय फलंदाजांनी न्यूझीलंडसमोर हाराकिरी पत्करली. पहिल्याच दिवशी भारताने आपले सर्व फलंदाज २४२ धावात गमावले. मागील काही सामन्यापासून खराब फॉर्मशी झुंजत असलेला भारताचा कर्णधार विराट या डावातही अपयशी ठरला.
हेही वाचा - अवघ्या १२ धावात घेतले १० बळी...पाहा व्हिडिओ
या सामन्यात नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. सलामीवीर पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि हनुमा विहारीच्या अर्धशतकांमुळे भारताला ६३ षटकात २४२ धावा करता आल्या. पृथ्वीने ८ चौकार आणि एका षटकारासह ५४, पुजाराने ६ चौकारांसह ५४ आणि विहारीने १० चौकारांसह ५५ धावा केल्या. विराट कोहली या डावातही अपयशी ठरला. त्याला ३ धावांवर साऊदीने पायचित पकडले. तर, अजिंक्य रहाणे साऊदीच्याच गोलंदाजीवर ७ धावांवर माघारी परतला. यजमान संघाकडून जेमिसनने ५, टीम साऊदी-ट्रेंट बोल्टने २ तर नील वॅगनरने १ बळी घेतला.
भारताच्या डावानंतर, न्यूझीलंडने फलंदाजीला सुरूवात केली आहे. टॉम लॅथम २७ तर, टॉम ब्लंडेल २९ धावांवर खेळत असून न्यूझीलंडच्या बिनबाद ६३ धावा झाल्या आहेत.
तत्पूर्वी, भारतीय संघात दोन महत्वाचे बदल करण्यात आलेले असून इशांत शर्माच्या जागी उमेश यादवला संघात स्थान देण्यात आली आहे. तर अश्विनच्या जागी रवींद्र जडेजाला संधी देण्यात आलेली आहे.
असा आहे भारतीय संघ -
मयांक अग्रवाल, पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, उमेश यादव, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह.
असा आहे न्यूझीलंडचा संघ -
टॉम ब्लंडेल, टॉम लाथम, केन विल्यम्सन (कर्णधार), रॉस टेलर, हेन्री निकोल्स, बीजे वॉटलिंग (यष्टीरक्षक), कॉलिन डी ग्रँडहोमे, ट्रेंट बोल्ट, कायले जेमिसन, नील वॅगनर आणि टिम साऊदी.