मेलबर्न - कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी ऑस्ट्रेलिया सरकारने पुढील सहा महिने सीमारेषाबंदीची घोषणा केली आहे. यामुळे भारताचा ऑक्टोबर महिन्यातील बहुप्रतीक्षित ऑस्ट्रेलिया दौरा अडचणीत सापडला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकावरही अनिश्चिततेचे सावट आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या दौऱ्याची सुरुवात तिरंगी टी-२० मालिकेने होणार होती, तर शेवट कसोटी मालिकेने होणार होता. आगामी ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वकरंडकाच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा होता. पण, कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे टी-२० विश्वकरंडकासह या दौऱ्यावरही अनिश्चिततेचे सावट आहे.
ऑस्ट्रेलिया सरकारने सहा महिन्यासाठी सीमारेषाबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे कोणताही संघ या कालावधीत ऑस्ट्रेलियात जाऊ शकणार नाही.
दरम्यान याविषयी बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, 'सध्य स्थितीत या संदर्भात कोणतेही भाष्य करणे उचित ठरणार नाही. कारण परिस्थिती निवळल्यास बंदी उठवली जाऊ शकते. पण, परिस्थिती पाहता ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचा समावेश असलेली तिरंगी स्पर्धा होणं अवघड आहे.'
चीनमधून प्रसार झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. ऑस्ट्रेलियातसुद्धा याचा फैलाव झाला आहे. ऑस्ट्रेलियात दोन हजारांहून अधिक लोकांना याची बाधा झाली असून १६ जणांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
हेही वाचा - बंदी उठली... स्मिथच्या कर्णधारपदाचा मार्ग झाला मोकळा
हेही वाचा - “REAL WORLD HERO”, आयसीसीने केलं वर्ल्डकप’स्टार’चं कौतुक!