इस्लामाबाद - पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर तौफिक उमरला कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर आले आहे. कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट होताच तौफिकने स्वत:ला घरातच क्वारंटाईन केले आहे. या संदर्भातील वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे.
तौफिकने २००१ मध्ये पाकिस्तान क्रिकेट संघात पदार्पण केले. त्याने पहिला कसोटी सामना बांगलादेशविरुद्ध खेळला. या सामन्यात त्याने १०४ धावांची खेळू केली होती. त्याच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने हा सामना २६४ धावांनी जिंकला होता.
तौफिकने ४४ कसोटी आणि २२ एकदिवसीय सामन्यात पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यात त्याने अनुक्रमे २९६३ व ५०४ धावा केल्या आहेत. कसोटीत त्याच्या नावावर ७ शतकं व १४ अर्धशतके आहेत. २०१४ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने अखेरचा कसोटी सामना खेळला होता. त्याला संघात स्थान कायम राखण्यात अपयश आले. यामुळे त्याने २०१६ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
दरम्यान, आतापर्यंत अनेक फुटबॉलपटूंना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्तसमोर येत होते. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोरोनाची लागण झालेला तौफिक पहिलाच खेळाडू ठरला.
पाकिस्तानातही करोनामुळे भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे. सद्य घडीला पाकिस्तानातील कोरोना रुग्णांची संख्या ५४,६०१ इतकी झाली आहे. १७,१९८ जण बरे झाले असून ११३३ जणांचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा - खेळाडूंचा सराव : आयसीसीची मार्गदर्शकतत्त्वे, चार टप्प्यांत सराव सत्राच्या आयोजनाचा सल्ला
हेही वाचा - सरावाला सुरुवात : शार्दुल ठरला आऊटडोअर ट्रेनिंग करणारा भारताचा पहिला क्रिकेटपटू