नवी दिल्ली - न्यूझीलंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू कोरी अँडरसन आता यूएसए संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसू शकतो. यूएसए भरती मोहिमेनंतर तो संघाचा भाग होऊ शकेल. २०१९मध्ये वर्ल्ड क्रिकेट लीगच्या विभाग दोननंतर अमेरिकेला एकदिवसीय संघाचा दर्जा मिळाला आहे.
हेही वाचा - जलदगती गोलंदाज टी.नटराजनने केले भारतासाठी पदार्पण
यूएसए आणि त्यांचे व्यावसायिक भागीदार एसीई त्यांच्या संघात व्यावसायिक खेळाडू आणण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरीव्यतिरिक्त पाकिस्तानचा डावखुरा फलंदाज समी अस्लमही या संघात समाविष्ट होऊ शकतो. अमेरिकेत तीन वर्ष वास्तव्य केल्यानंतर हे खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर अमेरिकेचे प्रतिनिधित्व करू शकतात.
यूएसए क्रिकेटचे सीईओ इयान हिगन्स म्हणाले, "आम्हाला क्रिकेटचे सामने जिंकायचे आहेत. आम्हाला वर्ल्ड टी-२० मध्ये आणि विश्वचषकात पात्रता हवी आहे." महत्त्वाचे म्हणजे अँडरसनने २०१८मध्ये न्यूझीलंडसाठी अखेरचा टी-२० सामना खेळला होता. हा सामना त्याने पाकिस्तानविरुद्ध खेळला.
३६ चेंडूत १०० धावा -
अँडरसन यावर्षी न्यूझीलंडमध्ये स्थानिक क्रिकेट खेळला नाही. तो गेल्या वर्षी ऑकलंडकडून सुपर स्मॅश स्पर्धा खेळला. २०१४मध्ये त्याने वनडेमध्ये सर्वात वेगवान शतक झळकावले होते. त्याने ३६ चेंडूत १०० धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर २०१५मध्ये एबी डिव्हिलियर्सने त्याचा विक्रम मोडला. २०१५च्या वर्ल्डकपमध्येही कोरी संघाचा महत्त्वाचा खेळाडू होता. त्याने ३३च्या सरासरीने २३१ धावा केल्या आणि १४ बळी घेतले.