किंगस्टन - जर तुम्ही ख्रिस गेलचे चाहते असाल तर तुमच्यासाठी ही धक्कादायक बातमी आहे. विंडीजचा हा धडाकेबाज फलंदाज इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वकरंडक स्पर्धेनंतर एकदिवसीय क्रिकेट प्रकारातून निवृत्त होणार आहे. याची घोषणा वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाने टि्वट करून दिली आहे.
ख्रिस गेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १९९९ मध्ये पदार्पण केले होते. गेल्या २० वर्षात एकापेक्षा एक विस्फोटक खेळी करून त्याने लाखो क्रिकेटप्रेमींची मने जिंकली आहेत. अनेक विक्रम त्याच्या नावावर केले आहेत. ब्रायन लारा यांच्यानंतर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. अष्टपैलू गेलने वेस्ट इंडीजतर्फे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक २३ शतके ठोकली असून, त्याच्या फिरकीने १६५ बळीही घेतले आहेत.
सध्या तो जगभरातील विविध टी-२० लीग खेळण्यात व्यस्त आहे. येता विश्वचषक डोळ्यासमोर ठेवून विंडीज बोर्डाने इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेत त्याची निवड करण्यात आली आहे. यंदाचा विश्वचषक त्याच्यासाठी शेवटचा असेल. मागील विश्वचषकात त्याने द्विशतक ठोकण्याचा पराक्रम केला होता. यंदाही काहीसा वेगळा चमत्कार त्याच्या बॅटमधून होईल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. गेल त्याचा अखेरचा एकदिवसीय सामना जुलै २०१८ मध्ये खेळला होता.