मुंबई - कसोटीतील तज्ज्ञ फलंदाज समजल्या जाणाऱया चेतेश्वर पुजाराने सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेन्टी सामन्यात शतक ठोकले आहे. रेल्वे विरुद्ध सौराष्ट्र यांच्यात झालेल्या सामन्यात पुजाराने ६१ चेंडूत नाबाद १०० धावांची खेळी केली. सौराष्ट्रकडून टी-ट्वेन्टी सामन्यात शतक ठोकणारा पुजारा पहिला फलंदाज ठरला आहे.
सामन्यात रेल्वेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पुजाराने सलामीला येत चांगली फलंदाजी केली. पुजारानेनाबाद १०० धावांची खेळी करताना १४ चौकार आणि १ षटकार खेचला. पुजाराने पहिल्या ५० धावा अवघ्या २९ चेंडूत पूर्ण केल्या. तर, दुसऱ्या ५० धावा ३२ चेंडूत केल्या. त्याला रॉबिन उथप्पाने ४६ धावा करताना चांगली साथ दिली. सौराष्ट्राने चांगली फलंदाजी करताना रेल्वेसमोर १८९ धावांचे आव्हान उभे केले.
रेल्वेकडून मृणाल देवधर २० चेंडूत ४९ धावा आणि प्रथम सिंग ३० चेंडूत ४० धावा यांनी सलामीला येत आक्रमक खेळी केली. यानंतर, तळातील फलंदाज आशिष यादव १६ चेंडूत २४ धावा आणि हर्ष त्यागी ७ चेंडूत १६ धावा करत रेल्वेचा विजय निश्चित केला.
चेतेश्वर पुजारा सध्या ३१ वर्षाचा आहे. पुजाराने आतापर्यंत ६८ सामने खेळताना १८ शतके आणि २० अर्धशतके ठोकली आहेत. तर, ५ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळताना ५१ धावा केल्या आहेत. पुजाराने आतापर्यंत एकही आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सामना खेळला नाही. त्याने आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचे नेतृत्व केले आहे.