मुंबई - नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) चेतेश्वर पुजारा, रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांच्यासह केंद्रीय करारातील पाच भारतीय क्रिकेटपटूंना त्यांच्या मुक्कामाची माहिती देण्यास अपयशी ठरल्याबद्दल नोटीस बजावली आहे. यावर बीसीसीआयने विलंबासाठी 'पासवर्ड गोंधळा'चे कारण दिले आहे.
नोटीस मिळालेल्या 110 खेळाडूंमध्ये स्टार खेळाडू स्मृती मंधाना आणि दीप्ती शर्मा यांचाही समावेश आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना नाडाचे महासंचालक नवीन अग्रवाल यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, "एडीएएमएस (अँटी-डोपिंग अॅडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट सिस्टम) सॉफ्टवेअरमध्ये 'व्हेयरअबाउट्स फॉर्म' भरण्याचे दोन मार्ग आहेत. एकतर खेळाडूंनी ते स्वतः भरावेत किंवा फेडरेशनने त्यांच्या वतीने फॉर्म भरावा. काही खेळाडू इतके शिक्षित नसतात किंवा त्यांच्याकडे इंटरनेटची सुविधा नसते. तेव्हा ते स्वतः एडीएएमएसचा 'व्हेयरअबाउट्स' फॉर्म शोधू शकत नाहीत किंवा फॉर्म भरुन अपलोड करू शकत नाहीत."
अग्रवाल म्हणाले, ''त्यांना आपापल्या फेडरेशनची मदत घ्यावी लागेल. त्यामुळे त्यांच्या मुक्कामाची माहिती अपलोड करण्याची जबाबदारी फेडरेशन घेते. कधीकधी क्रिकेटपटूंनाही ही प्रक्रिया स्वत: करणे अवघड होते.''
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. परंतु, खेळाडूंच्या स्वतःच्या मुक्कामाविषयीच्या माहितीचा नियम अनिवार्य आहे. तीन वेळा हा नियम तोडल्यास खेळाडूचे दोन वर्षाचे निलंबन होऊ शकते.