नवी दिल्ली - बहुचर्चित इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून होणार आहे. यापूर्वी ही लीग 29 मार्चपासून होणार होती, पण कोरोनाव्हायरसमुळे ती पुढे ढकलण्यात आली. माध्यमांच्या वृत्तानुसार, तीन वेळा चॅम्पियन आणि शेवटच्या सत्रातील उपविजेता चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघ ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात युएईला जाणार आहे.
सीएसकेनंतर, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि आयपीएलचे उर्वरित संघ ऑगस्टच्या तिसर्या आठवड्यात युएईला पोहोचतील. धोनी 'ब्रिगेड' ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यातच युएईमध्ये सराव सुरू करतील.
कोरोनारामुळे त्यांचे खेळाडू बर्याच दिवसांपासून घरी आहेत. त्यांना मोठ्या विश्रांतीनंतर क्रिकेटमध्ये परतण्यासाठी थोडा वेळ हवा असल्याचे सीएसकेच्या संघ व्यवस्थापनाने सांगितले आहे.
तत्पूर्वी, धोनीने चिन्नास्वामी स्टेडियमवर सराव करण्यास सुरुवात केली होती. मात्र, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर हे सराव सत्र रद्द करण्यात आले. विशेष म्हणजे यावर्षी इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित झाली नसती तर, बीसीसीआयला सुमारे चार हजार कोटी रुपयांचे नुकसान सहन करावे लागले असते.