नवी दिल्ली - प्रथम राजस्थान रॉयल्स आणि त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध चेन्नईला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले. चेन्नईच्या फलंदाजीत बळ आणण्यासाठी चाहत्यांनी सुरेश रैनाला संघात आणण्याची मागणी केली आहे. चेन्नईचे मुख्य कार्यकारी अधिकारी काशी विश्वनाथन यांनी रैना परत येईल की नाही, हे स्पष्ट केले.
काशी विश्वनाथन म्हणाले, ''आम्ही रैनाचा विचार करू शकत नाही. कारण तो उपलब्ध नाही. त्याच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो. आम्ही त्याच्या कमबॅकचा विचार करत नाही. चेन्नईचा संघ लवकरच जोमाने पुनरागमन करेल."
ते म्हणाले, "आम्ही भाग्यवान आहोत, की आमच्याकडे खूप चाहते आहेत. आम्ही नक्की पुनरागमन करू. हा एक खेळ आहे, चांगले आणि वाईट असे दोन्ही दिवस येतात. खेळाडूंना काय करावे हे माहित आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य परत येईल."
यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नईने गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा ५ गडी राखून पराभव करत दमदार प्रारंभ केला. त्यानंतर चेन्नईला दोन सामन्यात पराभव पत्करावा लागला. राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात चेन्नईला १६ धावांनी मात खावी लागली. तर, दिल्लीने चेन्नईला ४४ धावांनी सहज मात दिली.