हैदराबाद - 'महेंद्रसिंह धोनी' हे असे नाव आहे, जे क्रिकेटच्या मैदानात आणि मैदानाबाहेर मोठ्या उत्साहाने घेतले जाते. आयसीसीच्या तिन्ही चषकांवर अधिराज्य गाजवणारा, हुशार, धाडसी आणि संयमी अशी विशेषणे धोनीला दिली जातात. आज हाच धोनी 39 वर्षांचा झाला आहे. मागील वर्षीच्या विश्वकरंडक स्पर्धेपासून दूरावलेला धोनी भारतीय संघात नसला, तरी त्याची प्रत्येक चाहूल ही आजही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरते.
धोनीच्या 9 वर्षाच्या कर्णधारपदाच्या कारकिर्दीत भारतीय संघाने अनेक गोष्टी अनुभवल्या आहेत. टी-20 वर्ल्डकप, एकदिवसीय वर्ल्डकप, ऑस्ट्रेलियातील मालिकाविजय, चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद, कसोटीत प्रथमच प्रथम क्रमांकाचा संघ होणे इत्यादी गोष्टीत त्याचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही.
कर्णधार ते 'लीडर' -
संघाच्या विजयानंतर सर्वात मागे उभा राहणारा आणि संघाला गरज भासल्यावर नेहमी धावून येणारा खेळाडू अशी धोनीची विशेष ओळख आहे. 'चॅम्पियन बोर्डा'सोबत विजयाचा आनंद साजरा करतानाच्या अनेक फोटोंमध्ये धोनी एका बाजूला उभा असल्याचा दिसून येतो. 2018 आयपीएल हंगामाच्या विजयाच्या वेळी जेव्हा सर्व खेळाडू उत्सव साजरा करत होते, तेव्हा धोनी आपल्या मुलीसमवेत खेळत होता.
धोनीने क्रिकेटवर नेहमी प्रेम केले. जेव्हा कधी त्याला क्रिकेटमधून वेळ मिळाला, तेव्हा तो जगापासून दूर राहिला. खंबीर भूमिका आणि त्यानंतर सामन्याचा निकाल ही धोनीच्या कर्णधारपदाबद्दलची सर्वात महत्त्वाची गोष्ट होती. ''जर मला युद्धाला जावे लागले, तर मी धोनीला सोबत घेईन'', असे टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक गॅरी कर्स्टन म्हणाले होते. कर्स्टन यांचे हे वाक्य धोनीच्या स्वभावाची झलक देऊन जाते.
धोनी मैदानावर नेहमी बर्फासारखा थंड राहतो. संपूर्ण जगाचा श्वास थांबला असेल, तरी तो संयमी भूमिका घेतो. त्यानंतर तो अचानक असे काहीतरी करतो, की ज्याचा कोणी विचारही केला नसेल. सहजतेने दबावाचा सामना करण्याच्या वृत्तीमुळे त्याने 'कॅप्टन कूल' हे नाव सार्थ करून दाखवले.
धोनी आणि सरप्राईज -
धोनी आणि सरप्राईज असे एक वेगळेच चित्र आपल्याला नेहमीच पाहायला मिळाले आहे. 2004 च्या पदार्पणाच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला, तेव्हा त्याच्या जवळचे सरप्राईज झाले होते. काही सामन्यांनंतर त्याने पाकिस्तानविरुद्ध दमदार शतक ठोकले होते, तेव्हा प्रेक्षक सरप्राईज झाले होते. धोनीला 2007 मध्ये टी-20 आणि एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवले गेले, तेव्हा क्रिकेटतज्ज्ञ सरप्राईज झाले होते. 2014 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियामधील मालिकेत कर्णधारपद सोडले, तेव्हा बीसीसीआयदेखील सरप्राईज झाले होते.
जेव्हा धोनी कसोटीतून निवृत्त झाला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी पार्टी दिली होती. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमधील खेळाडूंचा एकत्र फोटोही घेण्यात आला होता. मात्र या फोटोत धोनीने सहभाग घेतला नव्हता. "मी आता कसोटी क्रिकेट खेळत नाही, त्यामुळे मी त्यात सहभाग घेऊ शकत नाही'', हे त्याचे त्तत्कालीन स्पष्टीकरण खूप काही सांगून गेले होते.
कारकीर्द -
39 वर्षीय धोनीने आतापर्यंत भारतासाठी 350 एकदिवसीय 98 टी-20 सामने खेळले असून त्याने अनुक्रमे 10773 आणि 1617 धावा केल्या आहेत. 2005 ते 2014 या कालावधीत धोनीने 90 कसोटी सामने खेळले. या प्रकारात त्याने 4876 धावा ठोकल्या. धोनी यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करुन भारतीय संघात पुन्हा स्थान मिळवू इच्छित आहे. पण आयपीएलवर सध्या कोरोनाचे सावट आहे.