कोलकाता - बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) शुक्रवारी कोरोना दरम्यान स्थानिक क्रिकेटपटूंना प्रशिक्षण सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. कॅबच्या वैद्यकीय समितीने क्रिकेटपटूंना लाळ आणि घाम वापरू नका, असा सल्ला दिला. शिवाय, लहान गटात सराव करण्यात यावा, असेही या सूचनांमध्ये नमूद केले गेले आहे.
आरोग्याच्या हिताचा विचार करता कोरोना नंतर क्रिकेटमध्ये लाळ वापरू नका, अशी शिफारस आयसीसी क्रिकेट समितीने केली आहे. “प्रशिक्षणादरम्यान कोणती खबरदारी घ्यावी आणि कोणत्या प्रोटोकॉलचे अनुसरण करावे याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. आयसीसीच्या मार्गदर्शक सूचनांचा विचार केला गेला. काय करावे आणि काय करू नये याची, यादी बनवावी असा निर्णय घेण्यात आला", असे कॅबने एका निवेदनात म्हटले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, "लाळ आणि घामाच्या वापरावर काही काळ बंदी घालण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून लहान गटात प्रशिक्षण सुरू केले जाऊ शकते."
कॅबचे अध्यक्ष अभिषेक दालमिया म्हणाले की, "आमची बैठक खूप चांगली होती आणि आम्ही लवकरच घेतलेल्या निर्णयांचा पाठपुरावा करू. दरम्यान, कार्यालय सुरू झाल्यावर विविध गोष्टींची काळजी घेतली जाईल. उपक्रम सुरक्षितपणे राबवण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील जेणेकरून विषाणूचा प्रसार होण्याचा धोका नसेल." आपत्कालीन परिस्थितीसाठी कॅबने आयसोलेशन कक्ष तयार केला आहे.