नवी दिल्ली - विश्वकंरडक स्पर्धेला आता काहीच दिवस शिल्लक राहिले असून प्रत्येक संघ तयारी करण्यात व्यग्र आहे. दुसरीकडे क्रिकेट विश्वातील दिग्गज माजी खेळाडू विश्वकरंडक कोण जिंकणार, कोणता खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करेल याचे भाकीत करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने या विश्वकंरडक स्पर्धेत डेव्हिड वॉर्नर आपल्या स्फोटक खेळीने धुमाकूळ घालणार असल्याचे म्हटले आहे.
![डेव्हिड वॉर्नर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/davidwarnernzxi060519__1__0705newsroom_1557230996_396.jpeg)
पुढे बोलताना ब्रेट ली म्हणाला की, डेव्हिड वॉर्नर हा धावांचा भुकेला असून या स्पर्धेत त्याची फलंदाजी पाहण्यासारखी असेल. विश्वकंरडक स्पर्धेच्या अखेरीस वॉर्नरच सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळवेल, असा विश्वासही ब्रेटलीने व्यक्त केला. नुकत्याच पार पडलेल्या आयपीएलच्या बाराव्या हंगामात वॉर्नरने धमाकेदार फलंदाजीत १२ सामने खेळताना १ शतक व ८ अर्धशतकांसह ६९.२० सरासरीने ६९२ धावा केल्या. तसेच 'ऑरेंज कॅप'चा मानही त्यालाच मिळाला.
![डेव्हिड वॉर्नर](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/aus-and-warner_1905newsroom_1558240351_232.jpg)
पाच वेळा विश्वविजेता असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने काही दिवसांपूर्वीच विश्वकंरडकासाठी आपल्या १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात १ वर्षांची बंदी संपल्यानंतर डेव्हिड वॉर्नरला स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडमध्ये येत्या ३० मे पासून विश्वकरंडक स्पर्धा खेळली जाणार आहे. यात ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना अफगाणिस्तान विरुद्ध १ जूनला होणार आहे.