मुंबई - कोरोनाविरुद्धच्या लढ्यात फक्त भारतातील नाही तर अन्य देशातील क्रिकेटपटूही आपापल्या परीने मदत करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी देखील कोरोना विषाणूमुळे पीडित असलेल्यांना आणि गरजू लोकांना मदत करत आहे. आफ्रिदीच्या या प्रयत्नांना भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांनी सोशल मीडियावरून पाठिंबा दिला आहे. तसेच त्यांनी आफ्रिदीला याकामी मदत करा, असे आवाहन देखील केले आहे. दरम्यान, युवी आणि हरभजन यांनी केलेले आवाहन भाजपच्या एका आमदाराला रुचलेले नाही. त्यांनी दोघांना आपले विधान मागे घेण्यास सांगितलं आहे.
भाजपचे आमदार राम कदम यांनी युवराज आणि हरभजन यांच्या आवाहनावर आक्षेप घेतला आहे. ते या विषयावर म्हणाले की, 'कोरोनामुळे भारतात देखील तीच परिस्थिती आहे. तरीदेखील भारतीयांचा विचार न करता भारतीय क्रिकेटपटू पाकिस्तानला मदत करा, असे आवाहन करत आहेत. हे वाईट आहे.'
आफ्रिदीने भारताबद्दल अनेकवेळा आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. त्यालाच भारतीय क्रिकेटपटू मदत करा, असे म्हणत आहेत. त्यांच्या या आवाहनामुळे भारतीयांमध्ये नाराजी आहे. यामुळे त्यांनी आपले विधान परत घ्यावे, अशी मागणीही कदम यांनी केली आहे. तसेच त्यांनी युवी आणि हरभजनला भारतासाठी आवाहन करण्यास सांगितलं आहे.
दरम्यान, युवराज आणि हरभजन यांनी केलेल्या आवाहनानंतर नेटीझन्सनीं त्या दोघांना चांगलेच सुनावले आहे. याशिवाय काहींनी त्या दोघांना पाठिंबा देखील दर्शवला आहे.
हेही वाचा - युवराज म्हणाला, गांगुलीने प्रोत्साहन दिलं पण धोनी आणि विराटने 'सपोर्ट' केला नाही
हेही वाचा - Corona Virus : रवींद्र जडेजाच्या पत्नीने केली २१ लाखांची मदत, हॉकी इंडियाकडून २५ लाख