रांची - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱया सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पायाला दुखापत झाल्याने मैदान सोडून बाहेर जावे लागले. यामुळ तो मोहाली येथे होणाऱ्या एकदिवसीय सामन्याला मुकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यापूर्वीच महेंद्र सिंह धोनीला चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
शमीची दुखापत किती गंभीर आहे, हे अजून कळू शकलेले नाही. विश्वकरंडक तोंडावर असताना शमीला झालेली दुखापत मोठी असेल, तर भारतीय संघासाठी हा मोठा झटका असू शकतो. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील ५ वे षटक टाकताना शमीला दुखापत झाली.
या षटकातील त्याने टाकलेल्या चेंडूवर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंचने स्ट्रेट ड्राईव्ह मारला. त्याने मारलेला चेंडू अडविण्यासाठी शमी झुकला मात्र, चेंडू सरळ येऊन शमीच्या पायावर आदळला. त्यानंतर शमी वेदनेमुळे मैदानावरच कळवळू लागला. त्यानंतर भारतीय संघाच्या फिजिओंनी लगेच मैदानात धाव घेतली. तरीही शमीने ते षटक पूर्ण केले.
शमीच्या दुखापतीबाबत माहिती देताना भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षक संजय बांगर म्हणाले, ‘शमीच्या पायाला वेदना होत आहेत. त्यामुळे तो चौथ्या सामन्यापूर्वी तंदुरुस्त असेल तर त्याला संधी मिळेल, अन्यथा भुवनेश्वर कुमारला संघात संधी देण्यात येईल.’
ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित चौथा आणि पाचवा वनडे सामना अनुक्रमे १० आणि १३ मार्चला मोहाली आणि दिल्ली येथे होणार आहे.