मुंबई - श्रीलंकाविरुद्धच्या दोन सामन्याच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका संघातून गोलंदाज ब्यूरन हेंड्रिक्स आणि फलंदाज किगन पीटरसन यांना बाहेर ठेवण्यात आले आहे. मागील आठवड्यात आफ्रिकेचे दोन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. दरम्यान, क्रिकेट आफ्रिकेने त्या दोन खेळाडूंची नावे जाहीर केलेली नव्हती.
संघातील इतर १७ सदस्य निगेटिव्ह असल्याचे आफ्रिका बोर्डाने सांगितले होते. आता जैविक प्रोटोकॉलनुसार दक्षिण आफ्रिका कोणत्याही खेळाडूला कसोटी संघात स्थान देऊ शकत नाही.
काही दिवसांपूर्वी श्रीलंका दौऱ्यासाठी दक्षिण आफ्रिका संघाची घोषणा करण्यात आली होती. यात कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता, आफ्रिका बोर्डाने वाढीव तीन खेळाडूंची निवड संघात केली होती. अनकॅप्ट फलंदाज रेनार्ड वॅन टोंडर आणि वेगवान गोलंदाज लूथो सिपाम्ला आणि अष्टपैलू खेळाडू ड्वेन प्रिटोरियस यांना संघात स्थान देण्यात आले होते. श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे.
असा आहे श्रीलंका दौऱ्यासाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ
क्विंटन डी कॉक (कर्णधार), टेम्बा बवुमा, एडेन मार्करम, फाफ डू प्लेसीस, डीन एल्गर, केशव महाराज, लुंगी एनगिडी, रेसी वेन डर डुसेन, सारेल एरवी, एनरिक नोर्त्जे, ग्लेंटन स्टरमॅन, वियान मल्डर, काइले वेरिने, माइगल प्रिटोरियस, ड्वेन प्रिटोरियस, लूथो सिपाम्ला आणि रेनार्ड वैन टोंडर.
हेही वाचा - Ind Vs Aus: बॉक्सिंग डे कसोटीत 'या' पाच रेकॉर्डवर नजर; पुजारा आणि लियोन यांना इतिहास रचण्याची संधी
हेही वाचा - Aus vs Ind: टीम इंडिया कसोटी मालिकेत उलटफेर करू शकते; ऑस्ट्रेलियाच्या माजी प्रशिक्षकांनी सांगितलं कारण