बीजिंग - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीजिंगच्या नगर क्रीडा स्पर्धा प्रशासन केंद्राने एक नोटीस बजावली आहे. या केंद्राने चीनची राजधानी बीजिंगमधील खेळांचे आयोजन त्वरित स्थगित केले.
शुक्रवारी बीजिंगमध्ये कोरोनाची दोन नवीन प्रकरणे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली. बीजिंगमधील कोरोनाच्या प्रतिबंध व नियंत्रणासाठी पुढील नोटीस येईपर्यंत सर्व प्रकारच्या क्रीडा कार्यक्रमांना आता स्थगिती देण्यात आली आहे, असे या नोटीसमध्ये नमूद केले आहे.
या नव्या रुग्णांमुळे चीनमधील कोरोना प्रकरणांची संख्या वाढून 83 हजार 75 वर पोहोचली आहे, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिली आहे. मात्र, मृतांची संख्या 4 हजार 634 असून त्यात वाढ झालेली नाही.
चीनच्या वुहान शहरातून आलेल्या या व्हायरसने जगाच्या गतीला ब्रेक लावला आहे. भारतालाही या व्हायरसचा मोठा फटका बसला आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये पहिल्यांदाच नव्या रुग्णांनी 11 हजाराचा आकडा पार केला. देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांजवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांमध्ये देशात तब्बल 11 हजार 458 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत, तर 386 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे.