नवी दिल्ली - इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नियामक मंडळाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी आयपीएलबाबतच्या आगामी बैठकीची माहिती दिली. पटेल म्हणाले, ''येत्या काही दिवसात या स्पर्धेबाबत चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली जाईल. शिवाय, बीसीसीआय आयपीएल 2020 च्या आयोजनासाठी गृह मंत्रालयाकडून परवानगी घेण्याच्या विचारात आहे.''
माध्यमांशी बोलताना ब्रिजेश पटेल म्हणाले, "गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक येत्या 7-10 दिवसांच्या कालावधीत होण्याची अपेक्षा आहे. स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत चर्चा होईल आणि आम्ही कार्यकारी बाबींकडे लक्ष देऊ. सप्टेंबरपर्यंत कोरोनाव्हायरसची स्थिती आपण पाहू. त्यानंतर भारत किंवा युएईमध्ये या स्पर्धेचे आयोजन करावे की नाही, हे आम्ही ठरवू. आम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लागेल, कारण ही परवानगी स्पर्धेसाठी अनिवार्य आहे."
कोरोनाच्या उद्रेकामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) यंदा होणारी आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा स्थगित केली आहे. काल झालेल्या आयसीसीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यंदा 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबरदरम्यान ही स्पर्धा होणार होती.
विश्वकरंडक स्पर्धा स्थगित झाल्यामुळे आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवाय यंदा होणारी आशिया चषक स्पर्धाही रद्द करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलचे आयोजन दुबईत होण्याची चर्चा होत असून बीसीसीआय याबद्दल घोषणा करण्याची शक्यता आहे. 26 सप्टेंबर ते 6 नोव्हेंबर दरम्यान आयपीएल खेळवण्यात येऊ शकते, असे वृत्त आहे.