चंदीगड - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी मंगळवारी पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या (पीसीए) मुल्लानपूर येथील नवीन क्रिकेट स्टेडियमची पाहणी केली. मोहालीतील मुख्य स्टेडियमपासून २० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या पंजाबमधील या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमच्या दौर्यादरम्यान शाह यांच्यासमवेत पीसीएचे अध्यक्ष राजिंदर गुप्ता आणि सचिव पुनीत बाली होते.
हेही वाचा -धक्क्यावर धक्के!..पाकिस्तानच्या आणखी तीन क्रिकेटपटूंना कोरोनाची लागण
बाली म्हणाले, ''शाह यांनी नवीन स्टेडियममध्ये थोडा वेळ घालवला आणि पाहणी केली. मुल्लानपूर येथील स्टेडियम सज्ज आहे आणि सामने आयोजित केले जाऊ शकतात. पुढील काही महिन्यांत इतर पायाभूत सुविधा तयार होतील.''
शाह यांनी सोमवारी संध्याकाळी चंदीगडच्या सेक्टर १६ क्रिकेट स्टेडियमलाही भेट दिली. हे स्टेडियम चंडीगड केंद्रशासित प्रदेश क्रीडा विभाग (यूटीसीए) अंतर्गत आहे. मंगळवारी शाह यांनी यूटीसीए अंतर्गत दुसर्या क्रिकेट मैदानालाही भेट दिली. काही दिवसांपूर्वी शाह यांनी उत्तराखंड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत स्टेडियमची पाहणी केली होती.