नवी दिल्ली - यावर्षी जुलैमध्ये शशांक मनोहर यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर हे पद रिक्त आहे. त्यामुळे सध्या आयसीसीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सिंगापूरचे इमरान ख्वाजा आणि न्यूझीलंडचे ग्रेग बर्कले शर्यतीत आहेत. भारत म्हणजेच बीसीसीआय न्यूझीलंडच्या ग्रेग यांनी पाठिंबा देण्याच्या तयारीत आहे.
१६ सदस्य असलेली आयसीसी ही क्रिकेटची सर्वात मोठी संस्था आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात आयसीसीच्या अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे. आयसीसीच्या अध्यपदासाठी ख्वाजा आणि बर्कले दोघांनीच अर्ज दाखल केले आहेत. माध्यमांच्या म्हणण्यानुसार संचालक मंडळातील सर्व सदस्यांमध्ये अध्यक्ष निवडीबाबत एक वाक्यता आहे. मात्र, ख्वाजा यांना भारताचा पाठिंबा मिळण्याची शक्यता खूपच कमी आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा(बीसीसीआय) न्यूझीलंडकडे जास्त कल आहे. बीसीसीआयच्या मते बर्कले अध्यक्षपदासाठी योग्य उमेदवार आहेत. ख्वाजा यांचेही बीसीसीआयबाबतचे मत फारसे चांगले नाही. त्यामुळे बीसीसीआय त्यांना पाठिंबा देणार नाही, अशी माहिती आयसीसीच्या एका माजी वरिष्ठ अधिकाऱयाने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.
मात्र, मतदानाला आणखी एक महिन्याचा कालावधी आहे. एखाद्याचे मत परिवर्तन करण्यासाठी हा कालावधी खूप झाला. या कालावधीत ख्वाजा भारताचे मन वळवण्यात कदाचित यशस्वीही होतील. तरीही त्यांच्या तुलनेत बर्कले यांचे क्रिकेटबाबतचे धोरण सरसच ठरण्याची शक्यता आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.
ख्वाजा सध्या आयसीसीचे उपाध्यक्ष आहेत. शशांक मनोहर अध्यक्ष असताना दोघांमध्ये मतभेद झालेले आहेत. त्यामुळे ख्वाजा यांना भारताचा पाठिंबा मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. दरम्यान, ख्वाजा यांना पाकिस्तानचा पाठिंबा मिळू शकतो. कारण आयसीसीमध्येही भारत आणि पाकिस्तानचे मतभेद आहेत.