नवी दिल्ली - कोरोनामुळे बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी राज्य संघटनांना एक पत्र लिहिले आहे. तामिळनाडू सरकारच्या निर्देशानुसार, तामिळनाडू सोसायटी नोंदणी कायदा १९७५अंतर्गत नोंदणीकृत संस्थांचे एजीएम ऑनलाइन असू शकत नाहीत, असे त्यांनी या पत्रात लिहिले आहे.
या कायद्यानुसार नोंदणीकृत संस्थांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली असल्याचेही शहा यांनी म्हटले आहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार एजीएम दरवर्षी ३० सप्टेंबर रोजी घेण्यात येणार होती. परंतु कोरोनाचा विचार करता तामिळनाडू सरकारच्या नोंदणी विभागाने २९ जुलै रोजी एक प्रसिद्धीपत्र जारी केले आहे. ज्या संस्था तामिळनाडू सोसायटी नोंदणी अधिनियम १९७५अंतर्गत नोंदणीकृत आहेत त्यांच्या एजीएमला सप्टेंबर ते डिसेंबर या तीन महिन्यांची मुदतवाढ दिली गेली आहे.
शहा म्हणाले, ''आम्ही या निवेदनाच्या मान्यतेसंदर्भात कायदेशीर सल्ला घेतला असल्याने बीसीसीआयने ३० सप्टेंबरपर्यंत एजीएम घेणे बंधनकारक नाही. म्हणूनच बीसीसीआय 30 सप्टेंबरपर्यंत एजीएम घेणार नाही. आम्ही तुम्हाला एजीएमच्या तारखेविषयी सांगू."