मुंबई - आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील वाढती स्पर्धा आणि वाढती सामन्यांची संख्या पाहता खेळाडूंसाठी मानसिक व शारीरिकदृष्ट्या बळकट होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. म्हणूनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतीय क्रिकेट बोर्डाने नवीन तंदुरुस्तीची चाचणी समोर आणली आहे. खेळाडूंच्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यासाठी यो-यो चाचणीची तरतूद आहे, पण बीसीसीआयने आता यात आणखी एका नवीन चाचणीचा समावेश केला आहे.
हेही वाचा - कृणालसोबतचे भांडण आले अंगउलट, दीपक हुड्डावर मोठी कारवाई
एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने अव्वल खेळाडूंचा संयम आणि वेग मोजण्यासाठी नवीन चाचणी कार्यक्रम सुरू केला आहे. त्याअंतर्गत संघातील अव्वल खेळाडूंना दोन किलोमीटरची शर्यत निर्धारित वेळेत पूर्ण करणे बंधनकारक असेल. नव्या वेळापत्रकानुसार यो-यो चाचणी व्यतिरिक्त संघातील महत्त्वाचे खेळाडू तसेच भारतीय संघात स्थान मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या युवांसाठी ही दोन किलोमीटरची शर्यत पूर्ण करणे आवश्यक असेल.
नवी चाचणी -
या शर्यतीची निर्धारित वेळ असेल. यानुसार वेगवान गोलंदाजांना ही शर्यत ८ मिनिट १५ सेकंदात पूर्ण करावी लागेल, तर फलंदाज-यष्टिरक्षक आणि फिरकी गोलंदाजासाठी ८ मिनिटे ३० सेकंदाची वेळ निश्चित केली जाईल. तथापि, १७.१ पातळीची यो-यो चाचणी उर्त्तीण होणेही आवश्यत असेल.
बीसीसीआय प्रमुख सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी या नियमास मान्यता दिली असून त्यानंतर सर्व करारातील खेळाडूंना या चाचणीबद्दल कळविण्यात आले आहे. खेळाडूंना या चाचणीत फेब्रुवारी, जून आणि ऑगस्ट महिन्यात भाग घ्यावा लागेल. सध्या ऑस्ट्रेलिया दौर्यावरुन परत आलेल्या खेळाडूंना या कसोटीतून वगळण्यात आले आहे. पण इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय आणि टी -२० मालिकेसाठी खेळाडूंच्या निवडीमध्ये या चाचणीचा वापर केला जाईल.