नवी दिल्ली - कोरोनामुळे भारतीय क्रिकेट संघ मार्चपासून एकही सामना खेळलेला नाही. या महामारीचा फटका बीसीसीआयलाही बसला आहे. यूएईत खेळवण्यात येणारी आयपीएल स्पर्धा ही एकमेव दिलासादायक बाब बीसीसीआयकडे आहे.
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड असलेल्या बीसीसीआयने प्रथमच कोरोनाच्या उद्रेकानंतर राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ११ प्रशिक्षकांच्या वार्षिक कराराचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय घेतला आहे. या ११ प्रशिक्षकांमध्ये रमेश पोवार, एस.एस. दास, हृषिकेश कानिटकर, सुभ्रतो बॅनर्जी आणि सुजित सोमसुंदर हे पाच निवृत्त भारतीय खेळाडू आहेत.
एका वृत्तपत्राच्या अहवालानुसार, एनसीए क्रिकेट प्रमुख राहुल द्रविडने गेल्या आठवड्यातच संबंधित लोकांना याबाबत माहिती दिली होती. ज्यांना पद सोडण्यास सांगितले आहे, त्यांच्यात माजी क्रिकेटपटू शितांशू कोटकचाही समावेश आहे.
या ११ प्रशिक्षकांना ३० ते ५५ लाख रुपयांपर्यंत मानधन देण्यात येत असून या प्रशिक्षकांचा करार या महिन्यात संपत आहे. हा निर्णय घेण्याआधी आमच्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही, असे यातील ५ प्रशिक्षकांनी एका वृत्तपत्राला सांगितले आहे.