हैदराबाद - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ऑक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या कालावधीसाठी खेळाडूंशी करार केला आहे. यात भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला करारातून मुक्त करण्यात आले आहे. तर काही खेळाडूंचा या करार यादीत नव्याने समावेश करण्यात आला आहे. बीसीसीआय दरवर्षी खेळाडूंशी श्रेणीनुसार करार करते. त्या करारानुसार खेळाडूंना मानधन दिले जाते. वाचा कोणत्या श्रेणीतील खेळाडूंना किती मानधन मिळते ते...
बीसीसीआयने खेळाडूंच्या करारासाठी अ+, अ, ब, क असे श्रेणींचे वर्गीकरण केले आहे. यात अ+ या गटातील खेळाडूंना वर्षाला ७ कोटी रुपये मानधन दिले जाते. अ गटातील खेळाडूंना ५ कोटी रुपये मिळतात. ब आणि क या गटातील खेळाडूंना अनुक्रमे ३ आणि १ कोटी रुपये मिळतात.
गुरूवारी बीसीसीआयने मयांक अग्रवाल, नवदीप सैनी, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर आणि दीपक चहर यांच्याशी करार करण्यात आले असल्याचे जाहीर केले.
या खेळाडूंना मिळाली बढती -
बीसीआयने दोन खेळाडूंना श्रेणीमध्ये बढती दिली आहे. यात केएल राहुलला 'ब' श्रेणीतून 'अ' गटात बढती मिळाली आहे. तर वृध्दीमान साहा 'क' गटातून 'ब' गटात गेला आहे.
बीसीसीआयने करार केलेले खेळाडू -
- अ + गट - विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह
- अ गट - रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत
- ब गट - वृद्धीमान साहा, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयांक अग्रवाल
- क गट - केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनीष पांडे, हनुमा विहारी, शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर.