मुंबई - इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रद्द केल्यानंतर बीसीसीआयने आता संघांच्या बक्षीस रकमेतही कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आयपीएल विजेत्या संघाला २० ऐवजी यंदा १० कोटी रुपये बक्षीस रक्कम मिळणार आहे. बीसीसीआयने आयपीएलमधील संघ मालकांना पाठवलेल्या सर्क्युलरमध्ये याचा उल्लेख केला आहे.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार असून यंदा विजेत्याला २० कोटी ऐवजी १० कोटी रक्कम मिळणार आहे. तर उप-विजेत्यांना यंदा १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटी रक्कम दिली जाणार आहे. तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावरील संघाला ४.३ कोटी रुपये मिळणार आहेत.
तसेच ज्या मैदानावर आयपीएल सामन्याचे आयोजन करण्यात येणार आहे, त्या राज्य क्रिकेट संघटनेला १ कोटी रुपयांचे मानधन मिळणार आहे, त्यातील ५० लाख बीसीसीआय देणार आहे. याची माहिती बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
बक्षीस रकमेच्या कपातीसह बीसीसीआयने कर्मचाऱ्यांसाठी नवे धोरण आखले आहे. यात पूर्वी ३ तासांच्या प्रवासासाठी बिझनेस क्लासचे तिकिट देण्यात येत होते. हा वेळ आता ८ तासांवर वाढवण्यात आला आहे. ८ तासांपेक्षा जास्त वेळेचा प्रवास असल्यास बिझनेस क्लासचे तिकिट मिळेल.
दरम्यान आयपीएलचा पहिला सामना २९ मार्चाला मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात खेळला जाणार आहे.
हेही वाचा - विराट, आता तुझं वय झालंय अधिक सराव कर.., भारताच्या माजी कर्णधाराचा सल्ला
हेही वाचा - गरुडझेप..! १६ वर्षाच्या शफालीने टी-२० च्या क्रमवारीत मिळवले पहिले स्थान